माथाडी संघटना बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय महामेळावा; 14 जिल्ह्यांतील 6 हजार पदाधिकारी सहभागी होणार

माथाडी संघटना बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय महामेळावा; 14 जिल्ह्यांतील 6 हजार पदाधिकारी सहभागी होणार

:पिंपरी | 27 सप्टेंबर 2026 : भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने चिंचवड येथे राज्यस्तरीय माथाडी पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी, 29 सप्टेंबर रोजी ऑटो क्लस्टरमध्ये होणाऱ्या या मेळाव्यात राज्यातील 14 जिल्ह्यांमधून 6 हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

माथाडी ट्रान्सपोर्टचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी काळेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत या मेळाव्याची माहिती दिली. कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित विविध प्रश्नांवर या मेळाव्यात सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्याचे उद्घाटन दुपारी 2 वाजता रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. माथाडी संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, कामगारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे हाताळण्यासाठीची संघटनात्मक रचना आणि आगामी काळातील कार्यक्रम यावर पदाधिकाऱ्यांमध्ये विचारविनिमय होईल.

संघटनेने 2030 पर्यंत 30 हजार पदाधिकाऱ्यांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी जिल्हानिहाय संघटन विस्तार, नवीन कार्यकर्त्यांची नोंदणी, कामगारांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. विविध क्षेत्रांतील माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यावर भर दिला जाणार आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बेरोजगार युवकांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ही आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी या महाकुंभात सहभागी होणार आहेत. पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्याच्या आधारे ऑन-द-स्पॉट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पाचवी उत्तीर्ण उमेदवारांपासून उच्चशिक्षित युवकांपर्यंत सर्वांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मेळाव्यात तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबवून त्यांच्या माहितीची नोंद केली जाणार आहे. या माध्यमातून रोजगाराच्या पुढील संधींसाठी उमेदवारांशी संपर्क ठेवला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories