आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काचे घर मिळावून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील – महापौर रवी लांडगे.....पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या योजनेंतर्गत किवळे येथील ७५ सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर
आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काचे घर मिळावून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील – महापौर रवी लांडगे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या योजनेंतर्गत किवळे येथील ७५ सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर
पिंपरी, ता. २२ - ''पिंपरी चिंचवड शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील प्रत्येक पात्र कुटुंबाला सुरक्षित आणि मूलभूत सुविधांनी सुसज्ज घर मिळाले पाहिजे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या किवळे प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीमध्ये निवड झालेल्या नागरिकांचे शहरातील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.'' , असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. या प्रसंगी महापौरांच्या हस्ते सोडतीतील विजेत्या सदनिका लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात पत्रांचे वाटप करण्यात आले. हक्काचे घर मिळाल्याने लाभार्थी आनंदून गेले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या उर्वरित ७५ सदनिकांची संगणकीय सोडत चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथील सभागृहात महापौर लांडगे यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर लांडगे पुढे म्हणाले, ''समाजातील सर्व घटकांना हक्काचं घर मिळावं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे. पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांचे घराचे स्वप्न केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्ण करत आहे. ''
महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले की, शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना सुरक्षित व मूलभूत सुविधांनी युक्त निवारा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने योजना राबविण्यात येत आहे. विजेत्या लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम भरणे व अनुषंगिक बाबींसाठीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन विभागात संपर्क साधावा.
. नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध...
''पिंपरी-चिंचवड शहरातील आर्थिक दुर्बल घटकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करुन देणे ही महापालिकेची प्राधान्याची बाब आहे. या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जात आहे. नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून आगामी काळातही अशा उपक्रमांना गती देण्यात येईल.''
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका