केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, कॉकरोज जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे यश
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, कॉकरोज जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे यश
पिंपरी, ता. २६ जुलै २०२६ - नीट (NEET)परीक्षा पेपरफुटी व देशातील शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकाराच्या निषेधार्थ देशातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर शनिवारी (ता. २५) धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर राजीनामा स्वीकारला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाल्याची बातमी समजताच 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP)आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणखात्याचा प्रदभार आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
'कॉकरोच जनता पार्टी'च्या इतरही प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही तब्बल 26 दिवस उपोषण केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.
20 जुलै रोजी दिल्लीत संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. अखेर पंतप्रधान मोदींनी स्वतः मध्यस्थी करत विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगितले. सरकार आणि 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) यांच्यात तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर अखेर तोडगा निघाला. 24 जुलै रोजी पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (NTA) मध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता सीजेपीकडूनही आपले आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) पोस्ट करत लिहिले की, "मी पहिल्या दिवसापासून या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड लपवले नाही. गेल्या 10 दिवसांतील घटनाक्रम पाहून माझे मन अत्यंत दुखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. जंतर-मंतरवर आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये आणि देशाची एकता अबाधित राहावी, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशसेवेची संधी मिळाली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 'वुई हॅव डन इट' अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते म्हणाले, ''असंख्य विद्यार्थी उन्हा-तान्हात, पावसात इथे बसले होते. मी त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना सलाम करतो. पोलिसांनी पाणी बंद केलं, जेवण बंद केलं, तुमची हिंमत तोडण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरीही तुम्ही तिथे बसलात. तुम्हाला सलाम. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला यासाठी मला हिरो बनवू नका. एका व्यक्तीलाच हिरो बनवण्याच्या नादात देशाची अवस्था वाईट करून टाकली आहे. एका व्यक्तीला संविधानापेक्षा मोठं केलं. जेव्हा एका व्यक्तीला संस्थांपेक्षा, संविधानापेक्षा मोठं केलं जातं, तेव्हा देशाचा 'कबाडा' (भंगार) होतो. आता लोकशाहीची सकाळ झाली आहे. देशातील जनता जागी झाली आहे. ही पहिली विकेट आहे. आता तर केवळ सुरूवात झाली आहे.'' अभिजित दिपके यांनी यावेळी सर्वांना आपापल्या राज्यात, जिल्ह्यात ज्या नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी कँडल मार्च काढण्याचे आवाहन केले.