आळंदी देवाची | २ ऑक्टोबर २०२६ : दिवेआगर येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर आळंदी आणि केळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आळंदी स्मशानभूमीत एकाचवेळी चार विद्यार्थ्यांच्या चिता जळत असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे आळंदीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आळंदी स्मशानभूमीत सुमीत भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे आणि कैवल्य सतिश वासनकर या चार विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी चार विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण होते.
तसेच सोहम तुकाराम भांडवलकर आणि राजवीर युवराज वहिले या दोन विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर आळंदीजवळील केळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुर्घटनेतील यश किरण वानखेडे याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अमरावती येथे, तर कौस्तुभ संदीप दौंड याचे पार्थिव श्रीरामपूर, अहिल्यानगर येथे नेण्यात आले.
आळंदी स्मशानभूमीत विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.