सांगवी | २ ऑक्टोबर २०२६ : सांगवीतील जयमाला सोसायटी परिसरातील गीता गॅरेजला लागलेल्या आगीत गॅरेजसह पाच मजली इमारतीतील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका लहान मुलीच्या हाताला आगीची झळ बसल्याची माहिती आहे. या घटनेतील नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष डॉ. धम्मरत्न शक्तिगुप्त गायकवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे.
माहितीनुसार, एका ठिणगीतून सुरू झालेली आग काही वेळातच भडकली आणि तिचा परिणाम संपूर्ण पाच मजली इमारतीपर्यंत झाला. गॅरेज मालक प्रदीप परदेशी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. इमारतीतील रहिवाशांच्या घरांमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले.
गॅरेजच्या पहिल्या मजल्यावर राहणारे राजेंद्र चोपडे यांच्या घरातील फर्निचर, बेडरूममधील साहित्य आणि इतर वस्तूंचे नुकसान झाले असून घरातील एसीचा स्फोट झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या मजल्यावरील काळे आणि तिसऱ्या मजल्यावरील राजेंद्र भिलारे यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या पार्श्वभूमीवर डॉ. गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाने दुर्घटनेची पाहणी करून नुकसानग्रस्तांचे अधिकृत पंचनामे करावेत, गॅरेज आणि बाधित घरांच्या नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि लागू नियमांनुसार आर्थिक सहाय्य व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. आगीची झळ बसलेल्या चिमुरडीसह सर्व बाधित कुटुंबांना आवश्यक मदत देण्याचे आवाहनही त्यांनी केले.