पिंपळे निलख परिसरातील कृत्रिम पाणी टंचाई तत्काळ दूर करावी, अन्यथा 'हंडा मोर्चा' - तुषार कामठे
पिंपळे निलख परिसरातील कृत्रिम पाणी टंचाई तत्काळ दूर करावी, अन्यथा 'हंडा मोर्चा' - तुषार कामठे
पिंपरी, ता. १४ - पिंपळे निलख येथील विशाल नगर परिसरात भेडसावत असलेली पाणी टंचाई कृत्रिम आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन दोन दिवसांत परिस्थिती सुरळीत करावी अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार गजानन कामठे यांनी दिला आहे.
याबाबत, कामठे यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे निलख परिसरात गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून जाणीवपूर्वक निर्माण केली जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
पिंपळे निलख येथील पाणी नवी सांगवीकडे वळवले जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. पिंपळे निलख हे देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येते, त्यामुळे येथील नागरिकांवर अन्याय होता कामा नये.
या पाणी टंचाईमागे टँकर माफियांचा हस्तक्षेपही असू शकतो, असा संशय व्यक्त करत कामठे यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरु करावा, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही नागरिक रस्त्यावर उतरुन महानगरपालिकेवर ‘हंडा मोर्चा’काढू, असा इशारा कामठे यांनी दिला आहे.
- हंडा मोर्चा, water pot protest march
- राष्ट्रवादी काँग्रेस, NCP Sharad Pawar faction, तुषार कामठे, Tushar Kamthe
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCMC, Pimpri Chinchwad Municipal Corporation
- पाणीपुरवठा, water supply
- , पाणी टंचाई, water scarcity, कृत्रिम टंचाई, artificial water shortage,
- पिंपळे निलख, Pimple Nilakh, विशाल नगर, Vishal Nagar,