गॅस तुटवड्याच्या वाढत्या तक्रारींमुळे ग्राहक संरक्षण विभागाकडून गॅस एजन्सी व हॉटेल्सची तपासणी
पिंपरी, ता. १३ - आखाती देशांतील युद्धामुळे देशामध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी साठेबाजी व काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पथकाने शहरातील विविध कंपन्यांच्या गॅस सिलिंडर वितरक एजन्सी आणि हॉटेलची दिवशी तपासणी केली. गॅस वितरकांकडे असलेला प्रत्यक्ष साठा आणि ऑनलाइन नोंदी बुकिंगपेक्षा अधिक सिलिंडर वाहतूक केली जात आहे का, याची पडताळणी केली.
हॉटेल तसेच रेस्टॉरंट चालवणाऱ्यांना व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी, त्यांच्याकडून घरगुती गॅसचा वापर केला जात आहे तसेच घरगुती गॅस मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तपासणीसाठी प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणी सुरु केली आहे. या तपासणी पथकामध्ये पथकात तीन विभागीय अधिकारी व दोन पुरवठा निरीक्षक आहेत.
तपासणी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या तक्रारीनुसार धाडी टाकून घरगुती गॅसचा अवैध वापर केला जात आहे का, याची शहानिशा केली. गुरुवारी (ता. ११) कासारवाडी, चिंचवडगाव आणि रावेत परिसरातील सहा गॅस वितरक एजन्सींची तपासणी केली. यावेळी गॅस सिलिंडर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. शुक्रवारी (ता १२) पथकाने देहूरोड, औंध-रावेत बीआरटी रस्ता परिसरातील गॅस वितरक एजन्सींची तसेच काही हॉटेलवर धाडी टाकून तपासणी केली.
याबाबत बोलताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे परिमंडळ अधिकारी डॉ. विजयकुमार क्षीरसागर म्हणाले, ''शहरात दोन दिवसांपासून पथकांकडून गॅस वितरक एजन्सींची तपासणी सुरू केली आहे. नागरिकांच्या तक्रारी जाणू घेऊन साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.''