हिंजवडी | ३ ऑक्टोबर २०२६ : भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्ता ओलांडणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक दिल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली. या अपघातात संबंधित व्यक्तीच्या दोन्ही हात-पायांना दुखापत झाली असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आयआयएमएस कॉलेज, मारुंजी रोड, पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली. याप्रकरणी गणेश निवृत्ती मोरे (वय २७, रा. दत्तवाडी, नेरे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी कासिफ रईस बेग (वय २०, रा.दत्तवाडी, नेरे, ता. मुळशी, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी हा हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-14 MY-1416) हयगयीने, बेदरकारपणे आणि भरधाव वेगात चालवत होता. त्यावेळी फिर्यादीचे वडील निवृत्ती त्रिंबक मोरे (वय ४७) हे सार्वजनिक रस्ता पायी ओलांडत होते. दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.
या अपघातात निवृत्ती मोरे यांच्या दोन्ही हात-पायांना दुखापत तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.