लग्नास नकार दिल्याने हिंजवडीत २४ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला

लग्नास नकार दिल्याने हिंजवडीत २४ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला

हिंजवडी | २९ सप्टेंबर २०२६ : लग्न करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून २४ वर्षीय तरुणीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मोनूकुमार भोला राय (वय २४, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा.  बिहार) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही एकाच कंपनीत कामाला होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला लग्न करण्याबाबत विचारले होते. मात्र, फिर्यादीने त्यास नकार दिला होता.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीला कंपनीतून काढून टाकल्याचे सांगत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीने त्याच्याशी बोलण्यास नकार देत आपण दोघे लग्न करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. याचा राग आल्याने आरोपीने चिडून फिर्यादीला खाली पाडले. त्यानंतर “तू जर माझ्याशी लग्न करणार नसशील तर मी तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत जवळील धारदार चाकूने तिच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या हल्ल्यात तरुणीच्या छातीच्या उजव्या बाजूला, डाव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर आणि उजव्या कंबरेजवळ चाकूने वार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली. तसेच फिर्यादीची बहीण सोडवण्यासाठी मध्ये आली असता आरोपीने तिला देखील ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ही घटना २८ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास सुमरास हिंजवडी येथे घडली. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories