थेरगावात सफाई मित्र सुरक्षा शिबिर; १,५०० हून अधिक सफाई सेवकांचा सहभाग

थेरगावात सफाई मित्र सुरक्षा शिबिर; १,५०० हून अधिक सफाई सेवकांचा सहभाग

पिंपरी | २८ सप्टेंबर २०२६ : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्याची तपासणी आणि सुरक्षित कामकाजाबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने थेरगाव येथे ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ आयोजित केले. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत झालेल्या या शिबिरात पाच क्षेत्रीय कार्यालयांमधील १,५०० हून अधिक सफाई सेवकांनी सहभाग घेतला.

कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांच्या हस्ते झाले. ‘अ’, ‘ब’, ‘ड’, ‘ग’ आणि ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयांतील सफाई सेवकांची हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि मधुमेहासह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले.


उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सफाई सेवकांचे काम शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी नियमित तपासणीमुळे आरोग्यविषयक समस्या प्राथमिक अवस्थेतच लक्षात येऊ शकतात, असे नमूद केले.

शिबिरात सफाई सेवकांच्या कुटुंबातील १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘लाईट हाऊस कौशल्य’ च्या माध्यमातून उपलब्ध मोफत कौशल्य प्रशिक्षणाची माहितीही देण्यात आली. बँकिंग, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ, संगणकीय विपणन, हॉटेल व्यवस्थापन, दुचाकी व मोबाईल दुरुस्ती यासह विविध अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, “सफाई सेवकांचे आरोग्य जपणे म्हणजे शहराच्या आरोग्याची काळजी घेणे होय,” असे सांगितले.

दरम्यान, अभियानाच्या पुढील टप्प्यात ३० सप्टेंबर रोजी ‘क’, ‘इ’, ‘फ’, ‘ह’ आणि ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयांतील सफाई सेवकांसाठी पुढील सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories