गृहिणींना राष्ट्रनिर्मात्या म्हणून ओळखले जावे, सर्वोच्च न्यायालयाचे गौरवोद्दार
पुणे, ता. 18 - पत्नीच्या निधनामुळे कुटुंबाचे जे नुकसान होते, त्याचे मूल्य किमान ३० हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे निश्चित करावे. गृहिणींना ‘राष्ट्रनिर्मात्या’ म्हणून ओळखले जावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी, 12 जूनला देण्यात आले.
एका रस्ते अपघातात पत्नी गमावलेल्या पतीला अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
‘‘व्यक्ती आणि राष्ट्राच्या जडणघडणीत गृहिणींचे मोठे योगदान असते. त्या राष्ट्रनिर्मात्या आहेत. त्यांच्या घरगुती सेवेचे मूल्य किमान ३० हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे निश्चित केले जावे. यापूर्वी मृत गृहिणींच्या भरपाईचा निर्णय घेताना त्यांना कुशल किंवा अकुशल कामगारांच्या बरोबरीने मानून किमान वेतनावर आधारित काल्पनिक उत्पन्न गृहीत धरले जात असे. मात्र, प्रत्यक्षात घराचे कामकाज पूर्णपणे गृहिणीवर अवलंबून असताना त्यांना कमावत्या सदस्यांवर अवलंबून असल्याचे म्हणणे विरोधाभासी आहे.
महिलांच्या विनामोबदला सेवांचा भारताच्या ‘जीडीपी’मध्ये १५ ते १७ टक्के एवढा वाटा असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गृहिणींचे राष्ट्राच्या घडणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रनिर्मात्या असे संबोधले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.