news
clock

 एचपीव्ही लसीकरणाला पुण्यात प्रारंभ, पुणे महापालिकेच्या २१ प्रसूतीगृहांमध्ये लस उपलब्ध

पुणे, ता. १० - गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देणारी एचपीव्ही लस पुणे महापालिकेच्या २१ प्रसूतिगृहांमध्ये उपलब्ध झाली आहे. एचपीव्ही लसीकरणाला पुण्यात सोमवारपासून (ता. ९) प्रारंभ झाला. बोपोडी येथील द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना, लायगुडे दवाखाना, शिवाजीनगर येथील दळवी दवाखाना तसेच कमला नेहरु रुग्णालय येथे पहिल्या दिवशी १४ ते १५ वयोगटातील २५ मुलींना ही लस देण्यात आली. 

एचपीव्ही लस सध्या शाळांमध्ये जाऊन दिली जाणार नसून केवळ महापालिकेच्या दवाखान्यामध्येच उपलब्ध असेल. ही लस देण्यासाठी मुलींची 'यु-विन' या पोर्टलवर ऑनलाइन स्वयं-नोंदणी करणे आवश्यक आहे. या पोर्टलवर लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध असून त्याद्वारे लस घेता येणार आहे. लसीकरणानंतर या मुलींना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. 

सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. या लसीबाबत गैरसमज पसरवणाऱ्या संदेश समाजमाध्यमांवर पाठवणाऱ्यांना आरोग्य विभागाने नोटीस पाठवली आहे. ही लस गेल्या १५ वर्षांपासून देण्यात येत असून ती सुरक्षित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

महापालिकेच्या हद्दीतील ३५ हजार मुलींचे लसीकरण करण्यात येणार ......

''ही लस सुरक्षित व प्रभावी आहे. ती मुलींना दिल्याने त्यांच्यामध्ये 'एचपीव्ही' विषाणूंच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होतात व ती आयुष्यभरासाठी टिकतात. त्यासाठी १४ ते १५ वयोगटातील मुलींचे लसीकरण करून घ्यावे. महापालिकेच्या हद्दीतील ३५ हजार मुलींचे लसीकरण करण्यात येणार असून त्यापैकी १९ हजार डोस मिळाले आहेत. टप्प्याटप्प्याने पुढील डोस मिळतील.''

- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे मनपा

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories