पिंपरी-चिंचवड पोलीसांची सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीवर 'मकोका अंतर्गत कारवाई'
पिंपरी, ता. २२ - पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२६ मध्ये सायबर गुन्हे करणाऱ्या एका टोळीमधील ९ आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हयातील सराईत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे केलेली ही पहिलीच कारवाई आहे.
दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी , पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात येथे सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंगअॅप द्वारे रुपये ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात फिर्यादी ज्येष्ठ नागरीकाची यांची फसवणसूक झालेली रक्कम वेगवेगळया बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती. सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान फिर्यादीच्या बँक खात्यातून फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या बॅंक खातेधारकांकडे चौकशी करुन कोल्हापुर, पुणे, दहिसर मुंबई, औरंगाबाद तसेच उदयपुर राजस्थान येथून गुन्हयात सहभागी असलेल्या ९ आरोपींना शोधून अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींची नावे, १) अभय बाबासाहेब पाटील (वय ३४ वर्षे, रा. ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर), २) शिवतेज राजेंद्र पोटे (वय ३० वर्षे, रा. वाघोली), ३) युवराज उर्फ संतोष सतीश मुदलीयार (वय ३५ वर्षे, रा. लोहगांव), ४) रॉनी उर्फ पंकज मंगु गिरीगोस्वामी (वय २४ वर्षे, रा. जि. उदयपुर, राज्यस्थान), ५) प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (वय २३ वर्षे, रा. जि. उदयपूर राज्यस्थान), ६) उमेश लक्ष्मीलाल भट्ट (वय २१ वर्षे, रा. भडसोरा, राजस्थान), ७) महेश करबसपा उडचणे (वय २८ वर्षे, रा. दहिसर ईस्ट, मुंबई), ८) राहुल बहारदुरप्रसाद मौर्य (वय २४ वर्षे, रा.दहिसर पूर्व, मुंबई) व ९) शेख अब्दुल रहिस शेख अब्दुल रशीद (वय २६ वर्षे, रा. समता नगर, औरंगाबाद) अशी आहेत. सदर आरोपींविरोधात एका पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
वरील आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. या स्वतः टोळीतील सदस्यांनी एकत्रीत व वैयक्तीक रित्या जाळे तयार करुन वेगवेगळया सोशल मिडीया माध्यमातून खोटी अमिषे दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचे अमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. टोळीतील सदस्यांनी डीजीटल माध्यमांचा वापर करुन आंतराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून फसवणुकीची रक्कम युएसडीटी सारख्या अभासी चलनात वर्ग करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करुन देशाच्या अर्थव्यस्थेला धोका निर्माण केला आहे. यातील अटक आरोपींनी संघटीतपणे पिंपरी-चिंचवड, मुंबई शहर, व मध्यप्रदेश राज्यात सायबर फसवणुकीचे गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे सायबर फसवणुकीचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे (सायबर पोलिस ठाणे) यांनी पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता या प्रस्तावातील कागदपत्रांची छाननी करुन या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम 3(l)(ii) ३(४), नुसार कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार,सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे (सायबर पो.स्टे), सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलिस उप निरीक्षक वैभव पाटील व प्रकाश कातकडे, पोलिस हवालदार दिपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील व विनायक म्हसकर, पोलिस शिपाई अतुल लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, महेश मोटकर, प्रविण शेळकंदे, सोपान बोधवड, सुरज शिंदे, दिपक माने, स्वप्नील खनसे व शिवाजी बनसोडे, (सर्व सायबर पो.स्टे) यांच्या पथकाने केली आहे.