कासारवाडीजवळ एसटी महामंडळाच्या शिवाई गाडीची दुचाकींना धडक
पिंपरी, ता. २२ - कासारवाडी मेट्रो स्थानकाखाली एसटी महामंडळाच्या शिवाई इलेक्ट्रिक बसने काही दुचाकी गाड्यांना धडक दिली. या अपघातात एकाला गंभीर दुखापत व काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.
पावसामुळे दुचाकीस्वार मेट्रो स्टेशनच्या खाली थांबले होते. त्यावेळी कासारवाडीहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शिवाई या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने दुचाकींना धडक दिली. अपघातामुळे परिसरात मोठा आवाज झाला आणि सर्वांचा एकच गोंधळ उडाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली. या अपघातामुळे दुचाकींचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.