केतन अग्रवाल हत्या प्रकरण - सिया व चेतनच्या पोलिस कोठडीत तीन जुलैपर्यंत वाढ
पिंपरी, ता. ३० - केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना सोमवारी (ता. २९) वडगाव मावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. त्यावर, विचार करून न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत तीन जुलैपर्यंत वाढ केली.
पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सिया आणि चेतनला न्यायालयात हजर करण्यात आले. ''तपासात अनेक महत्त्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची कोठडी द्यावी.'', अशी मागणी पोलिसांनी केली. सिया व चेतन यांना पुन्हा पोलिस कोठडी देण्यास बचाव पक्षाने न्यायालयात विरोध केला. 'दोन्ही आरोपी तपासात सहकार्य करत आहेत. सात दिवसांची पोलिस कोठडी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता न्यायालयीन कोठडी द्यावी,' अशी मागणी बचाव पक्षाने केली.
'आरोपींनी गुन्ह्यापूर्वी विविध ठिकाणी भेटून कट रचल्याची माहिती समोर आली. आहे. तेथे पडताळणी करायची आहे. गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचा डिजिटल डेटा डिलिट करण्यात आल्याचा संशय असून तो मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींनी गुन्ह्यानंतर कोणाशी संपर्क साधला, कोणाला माहिती दिली किंवा चर्चा केली का, याबाबत तपास सुरू आहे. घटनाकाळातील मोबाइल लोकेशन, सीडीआर तपासणी केली जात आहे. यापूर्वी केतनला जिवे मारण्याचा प्रयत्न एकदा झाल्याची माहिती समोर आली आहे. सियाने केतनचा पासपोर्ट नष्ट केल्याचा संशय आहे. तो मिळवून जप्त करायचा आहे. तपासादरम्यान काही महत्त्वाचे साक्षीदार समोर आले असून त्यांचे जबाब नोंदवून आरोपींसमोर पडताळणी करणे बाकी आहे. आरोपींनी गुन्ह्यानंतर लोणावळ्यात पुन्हा भेट घेऊन घटनास्थळ निश्चित केले होते का, या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे,' असे पोलिसांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करुन न्यायालयाने सिया व चेतनच्या पोलिस कोठडीत तीन जुलैपर्यंत वाढ केली आहे.