ज्योतिबानगर-तळवडेमध्ये भिंत कोसळून मजूर पती-पत्नीचा मृत्यू
पिंपरी, ता. १४ - तळवडे येथील ज्योतिबा नगर परिसरात कंपनीच्या सीमाभिंतीचे (कंपाऊंड वॉल) बांधकाम सुरु असताना भिंत कोसळून मजूर पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे. असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जागा मालक सदाशिव आगळे यांच्या इंडक्शन थर्मल कंपनीच्या खुल्या प्लॉटभोवती सीमाभिंत बांधण्याचे काम सुरु होते. हे काम कंत्राटदार दीपक देवाजी जाधव (रा. चाकण) यांनी घेतले होते. या बांधकामासाठी मजूर आणण्यात आले होते. काम सुरु असताना अचानक बांधकाम सुरु असलेली भिंत मजूर दांपत्याच्या अंगावर कोसळली. विटांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने या पती-पत्नीचा मृत्यू झाला. स्वतःचा संसार फुलवण्याआधी हे दांपत्य मरण पावले.
सचिन शंकर राठोड (वय ३०) आणि त्यांची पत्नी कोमल सचिन राठोड (वय २५, दोघेही मूळ रा. लोहा, जि. नांदेड) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. मनोहर भिकू चव्हाण (वय ३८, रा. चाकण) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर देहूगाव येथील इम्पेरियल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवले. पिंपरी-चिंचवड पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.