कामगारदिनानिमित्त गुरुवारी चिंचवडला श्रम-उद्योग परिषद, यशस्वी उद्योजक व कष्टकऱ्यांचा होणार सन्मान
Apr 27 2026
21
कामगारदिनानिमित्त गुरुवारी चिंचवडला श्रम-उद्योग परिषद, यशस्वी उद्योजक व कष्टकऱ्यांचा होणार सन्मान
पिंपरी, ता. २७ - दिवंगत कवी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ३४ वी श्रम-उद्योग परिषद येत्या गुरुवारी (ता. ३०) चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात आयोजित केली आहे. या परिषदेत प्रसिद्ध उद्योजक भगवान पठारे नारायण सुर्वे कृषी उद्योग जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. सोबतच कष्टकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. दुपारी ठीक ३:३० वाजता या परिषदेचा प्रारंभ होणार आहे.
आंतरराष्ट्रीय कामगारदिन, महाराष्ट्र राज्य स्थापनादिन आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून सोहळा होणार आहे. मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर व मनोहर पारळकर यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थितीत असणार आहे. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत.
परिषदेमध्ये श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सहचारिणी नीता सातपुते यांना कृष्णाबाई नारायण सुर्वे मास्तरांची सावली सन्मान, प्राचार्य शंकर देवरे यांना नारायण सुर्वे भला माणूस सन्मान, कामगार साहित्यिक अरुण गराडे यांना नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान, कवयित्री संगीता झिंजुरके यांना नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार, डॉ. स्वाती पाटील आणि नीलेश शेंबेकर यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तसेच मितेश डूळगज (शवविच्छेदक मजूर), प्रशांत बराटे (स्मशानभूमी सेवक), मुरलीधर फुंदे (सुरक्षारक्षक), कल्पना कदम (मोलकरीण), मनोजकुमार राम (मजूर) आणि प्रवीण बागूल (सफाई मजूर) या कष्टकऱ्यांना गौरवण्यात येणार आहे.