दुसऱ्या मुलाशी लग्न ठरल्याने प्रियकराने प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरला, चंदननगरमधील घटना, तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु
दुसऱ्या मुलाशी लग्न ठरल्याने प्रियकराने प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरला, चंदननगरमधील घटना, तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु
पुणे, ता. ७ - प्रेमसंबंध असताना आपल्या प्रेयसीचे लग्न ठरल्याचे समजल्यावर प्रियकराने प्रेयसीच्या तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. ती घरी एकटी असताना प्रियकराने हा डाव साधला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणीने जखमी अवस्थेत तिच्या दादाला फोन करुन ही घटना सांगितली. तोवर आजूबाजूच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोचलेल्या पोलिसांना या तरुणीने बोलता न आल्याने आरोपीचे नाव लिहून दिल्याने हल्लेखोर प्रियकर तत्काळ पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. ही घटना २९ एप्रिलला पुण्यात चंदननगर परिसरात घडली आहे. या २२ वर्षीय तरुणीवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, रा. चंदननगर, मूळ उत्तर प्रदेश) व आरोपी दिलीप राठोड (वय २२) हे एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. उजालादेवी अलीकडेच आपल्या मूळगावी गेली होती. तेव्हा कुटुंबीयांनी तिचा विवाह दुसऱ्या मुलासोबत ठरवला. पुण्यात परत आल्यावर ही गोष्ट तिने प्रियकर दिलीपला सांगितली आणि आता आपलं लग्न होणार नाही, याची स्पष्ट कल्पना दिली. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरल्याचे समजताच दिलीप संतापला. २० एप्रिलला उजालादेवी घरात एकटीच असताना दिलीप तिच्या घरी गेला आणि रागाच्या भरात ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले आणि तो फरार झाला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उजालादेवीने आपल्या भावाला फोन करुन तातडीने घरी यायला सांगितले. भाऊ तातडीने घरी आला तोवर आजूबाजूचे लोक घरात जमले होते. त्यांनी उजालादेवीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसही रुग्णालयात पोचले. उजालादेवीने बोलता येत नसल्याने खुणेने कागद-पेन मागितला व आरोपीचे 'दिलीप राठोड' असे नाव लिहून दिले. यावरून पोलिसांनी तातडीने शोध घेत दिलीप राठोडला अटक केली.