मालवाहू वाहनांमधून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने थेट रद्द करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश
मालवाहू वाहनांमधून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने थेट रद्द करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश
पुणे, ता. २४ - अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी यापुढे मालवाहू वाहनांमधून बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने थेट रद्द करण्याचे कडक निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. विधानपरिषदेत शिवसेनेचे (यूबीटी) आमदार सुनील शिंदे यांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात साखरपुड्याच्या वन्हाडाच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघाताच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती.
लक्षवेधीला उत्तर देताना परिवहन मंत्री म्हणाले की, अलीकडेच घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे १३ आणि ११ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही दुर्घटनांमध्ये मालवाहू वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक हेच मुख्य कारण होते. या प्रकरणांची गंभीर दखल घेत केवळ चालकांवरच नव्हे, तर संबंधित वाहनमालकांवरही गुन्हे दाखल केले असून, त्या वाहनांचे परवानेही रद्द केले आहेत. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना शासनाकडून जाहीर झालेली प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कायदेशीर प्रक्रियेनंतर वितरित केली जाईल.
राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन राज्य शासनाने एसटी महामंडळासाठी ८,३०० नवीन बस खरेदी केल्या आहेत. त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहेत. सध्या आवश्यक मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात दर तासाला एसटी बस चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत दर अर्ध्या तासाने बससेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्यानंतर, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असल्यास त्यांना विशेष सवलतीच्या आणि माफक दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास एसटी महामंडळ थेट त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.