'माझी वसुंधरा' अभियानात लोणावळा नगरपरिषदेला तृतीय क्रमांक, तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर
Feb 20 2026
50
'माझी वसुंधरा' अभियानात लोणावळा नगरपरिषदेला तृतीय क्रमांक, तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर
पिंपरी, ता. २० - राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत लोणावळा नगरपरिषदेला राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या यशाबद्दल नगरपरिषदेला तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हे यश लोणावळा शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
लोणावळा नगरपरिषदेने शहरात घनकचरा व्यवस्थापन, घरगुती कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती, वृक्षारोपण, जलसंवर्धन, ऊर्जा बचत तसेच विविध स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबवल्या. प्रशासन व नागरिक यांच्या उत्तम समन्वयातून या उपक्रमांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
या यशाबद्दल नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, मुख्याधिकारी अशोक सावळे, आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी शहरवासीयांचे आभार मानले. स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या सक्रिय सहभागामुळेच हा सन्मान प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
''पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवून लोणावळा शहराने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. माझी वसुंधरा अभियानात शहराला राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळाल्यामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे. भविष्यात प्रथम क्रमांक मिळवायचा संकल्प आहे. पर्यावरणपूरक व स्वच्छ लोणावळा घडविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य पुढेही कायम राहील, ''असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.