‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात कारवाई, ३१ हजार रुपयांचा दंड वसूल
‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात कारवाई, ३१ हजार रुपयांचा दंड वसूल
पिंपरी, ता. २१ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागाकडून प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत नागरिक व व्यावसायिकांकडून एकूण ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून प्लास्टिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, आरोग्य सहाय्यक गीता रिल व जगदीश चिंचोलीकर, अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या मोहिमेत इंद्रायणी नगर (प्रभाग क्रमांक ८) येथे प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत देऊन १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. याच ठिकाणी आरोग्याला हानी पोचवणाऱ्या गोष्टी, कचरा टाकणे यावर व प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करत आणखी ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर (प्रभाग क्रमांक ९) येथे करण्यात आलेल्या कारवाईत १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ''महापालिकेच्या या कारवाईमुळे प्लास्टिक वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत होत आहे. शहर स्वच्छ व वसुंधरापूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे.'', असे मत क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांनी यावेळी व्यक्त केले.
प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे
शहरात प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात महापालिका सातत्याने कठोर कारवाई करत आहे. पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकमुक्त शहराची संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कचरा व्यवस्थापन नियमांचे काटेकोर पालन करून, ओला व सुका कचरा वेगळा करणे, तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत शहर घडविण्यासाठी सहकार्य करावे.
- डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
कारवाई सुरु राहील
प्लास्टिक बंदीचे नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येईल. शहरातील पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत आवश्यक आहे. व्यावसायिकांनी वसुंधरापूरक पर्यायांचा अवलंब करून महापालिकेला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईसोबतच पुढील कठोर पावले उचलली जातील.
- किरणकुमार मोरे,सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका