शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषाने २.०९ कोटींची सायबर फसवणूक
पिंपरी, ता. १० - सायबर गुन्हेगारांनी शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल २ कोटी ९ लाख ३० हजार ५३७ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली. फिर्यादीच्या वडिलांना आरोपींनी व्हॉट्सअॅपवर “5paisa Private Advisory” व “L781-5paisa Customer Service Center” या ग्रुपमध्ये जोडले. त्यानंतर शेअर ट्रेडिंग व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना एका लिंकद्वारे “5PASPMTA” नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. या अॅपमध्ये खोटा नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या शेअर्स ट्रेडिंग व आयपीओच्या नावाखाली विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करुन घेत फिर्यादीची एकूण २.०९ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
या घटनेत गौरव नामक व्यक्ती, महिला व विविध बॅंक खातेधारक आरोपी आहेत. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.