मोबाईल हिसकावून युवकाला मारहाण, संभाजीनगर-चिंचवडमधील घटना
पिंपरी, ता. १४ - मोटारसायकलवरुन येऊन युवकाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला आणि त्या युवकाने त्याचा पाठलाग करुन पकडले असता मोबाईल चोराने युवकाला लोखंडी हत्याराने दुखापत केली. ही घटना शुक्रवारी (ता. १३) संभाजीनगर-चिंचवड येथे घडली.
शुभम शरद शिंदे (वय २२, रा. शरद नगर, चिखली) याने याबाबत तक्रार दिली आहे. आरोपी जॉर्डन राजु साळवे (वय २० वर्षे, रा. घरकुल, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारीनुसार, शुभम सकाळी सुमारे ९.१० वाजता पायी जात असताना जॉर्डन राजु साळवे (वय २०, रा. घरकुल, चिखली, पुणे) या आरोपीने मोबाईल हॅन्डसेट जबरीने चोरला.
फिर्यादीने आरोपीला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने लोखंडी दुलनेने शुभमच्या उजव्या हाताच्या बोटांजवळ मारहाण करून त्याला जखमी केले. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणी भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.