मोशी | २९ सप्टेंबर २०२६ : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मोशी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र लक्ष्मण कोकाटे (वय ३७, नेमणूक एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. जीशान अनवरखान (वय ३३, सध्या रा. लक्ष्मी पार्किंग, मोशी, मूळ रा. खेवर पोस्ट-कुटीपीसी, थाना कटकमसांडी, जि. हजारीबाग, झारखंड) असे आरोपी कंटेनर चालकाचे नाव आहे.
२८ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजून ३५ मिनिटांनी भारतमाता चौक, मोशी येथे पुणे-नाशिक महामार्गावर ही घटना घडली. अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा एक अनोळखी व्यक्ती रस्ता ओलांडत असताना नाशिक-पुणे महामार्गावरून भोसरीच्या दिशेने जाणाऱ्या NL.01.N.6120 क्रमांकाच्या कंटेनरने त्याला धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवत पादचाऱ्याला धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत संबंधित व्यक्ती खाली पडून त्याच्या पोटाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. या दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.