news
clock

दूषित पाणी पिल्यामुळे मोशीमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

वसतीगृहाच्या व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारावर संतप्त विद्यार्थ्यांचे ताशेरे 

पिंपरी, ता. १४ - दूषित पाणी पिल्यामुळे मोशी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. या विद्यार्थ्यांवर भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी वसतीगृहाच्या व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार सर्वांसमोर आणला आहे. वसतिगृहातील दूषित पाणी पिल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरु झाला. प्रकृती खालावल्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले असून ८ ते १० विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रशासनाचा ढिसाळ-भोंगळ कारभार समोर आणला. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही वसतिगृहातील वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत वारंवार तक्रार करुनही दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेरचे पाणी पिण्याची वेळ आली, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील व्हिडिओ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करत स्वच्छ पाण्याची मागणीदेखील केली होती. 

आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी याबाबत अद्याप  कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी-पालक संतापले आहेत. मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अनिल तिटकारे यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories