पवना नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी
पिंपरी, ता. १४ - नदीलगतच्या गावातील सांडपाण्यामुळे पवना नदी प्रदूषित होऊ लागली आहे. नदी प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पाण्याचे नमुने तपासावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राकेश घारे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
घारे यांनी म्हटले आहे की, पवना नदीच्या तीरावर गहुंजे, शिरगाव, सोमाटणे, धामणे, बेबडओहोळ, परंदवडी, उर्से, शिवणे ही गावे वसलेली आहेत. या गावांमध्ये गेल्या दशकात मोठ्या प्रमाणाव इमारती उभ्या राहिल्या आहेत. लोकसंख्याही दुपटीपेक्षा वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व गावांतील सांडपाण्यासह उर्से, बेबडओहोळ येथील कंपन्यांतील रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पवनेत मिसळले जात आहे. यामुळे बेबडहोळपासून पुढे पवनेचे पाणी प्रदूषित झाले आहे.
अनेक गावांनी बंद गटार योजना राबवल्या आहेत. या बंद गटार योजनेचे सांडपाणी प्रत्यक्ष नदीत सोडले जात आहे. याच दूषित पाण्याचा वापर पवन मावळातील सर्व गावांसह मामुर्डी, रावेत, किवळे, तळेगाव, पिंपरी-चिंचवड येथील पाणी योजनांद्वारे केला जातो. सर्वच गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते गटाराचे पाणी पवनेत सोडणे गरजेचे असतानाही सर्वच गावांनी कोणतीही दखल न घेता दूषित पाणी पवनेत सोडले आहे. यामुळे बेबडओहोळ ते रावेतपर्यंत नदीचे प्रचंड प्रदूषण झाले आहे.
या दूषित पाण्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने पाण्याचे नमुने तपासून आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी घारे यांनी केली आहे.