महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दरमहा ५० हजार रुपये इंधनभत्ता मिळणार, स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर , नागरीकांमध्ये नाराजी
Apr 04 2026
94
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दरमहा ५० हजार रुपये इंधनभत्ता मिळणार, स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर
पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांना खासगी वाहन वापरासाठी दिल्या जाणाऱ्या इंधन भत्त्यामध्ये वाढ होणार आहे. दरमहा ५० हजार रुपये इंधनभत्ता मिळण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, मंजुरीमुळे करदात्या नागरीकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
सन २०१७ मध्ये महापालिकेतील विविध अधिकाऱ्यांना शासकीय कामांसाठी स्वतःचे खासगी वाहन वापरण्यास परवानगी दिली आहे. तेव्हा पेट्रोलवरील वाहनासाठी दरमहा ३९ हजार ५६० रुपये आणि डिझेलवरील वाहनासाठी दरमहा ३६ हजार ५६० रुपये भत्ता (प्रतिपूर्ती) निश्चित केला होता. पुढच्या काळात इंधनांचे दर व वाहनांच्या देखभाल खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या भत्त्यात वाढ करुन महिना ५० हजार रुपये भत्ता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
मात्र, या निर्णयामुळे करदात्या नागरीकांमध्ये मोठी नाराजी परसरली आहे. दरमहा ५० हजार रुपये इंधन भत्ता देणे हे चुकीचे आहे असा सूर उमटत आहे. महापालिका प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी शहरवासियांनी केली आहे.