निघोजे | ३ ऑक्टोबर २०२६ : निघोजे परिसरात एका २९ वर्षीय तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी करत त्याच्या पँट आणि शर्टच्या खिशातील ११ हजार ४७० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याच्या गुन्ह्याचा दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत छडा लावला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय चिंतामण देसले पाटील (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत, एमआयआरजे प्लास्ट कंपनीसमोर, निघोजे-तळवडे ब्रिज रोडवर ही घटना घडली.
फिर्यादीनुसार, अनोळखी रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी संगनमत करून फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर दमदाटी करून फिर्यादीच्या पँट आणि शर्टच्या खिशातील ११ हजार ४७० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने सीसीटीव्हीचे तांत्रिक विश्लेषण करून रिक्षाचा क्रमांक मिळवला. त्याआधारे आरोपींचा शोध घेत अमन उर्फ शाहबाज समीर शेख (वय २६) आणि शेखर बापू माने (वय २१) यांना २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. एका विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमन उर्फ शाहबाज समीर शेख हा निगडी पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातून १५ दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. शेखर बापू माने याच्यावरही जबरी चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.