एसआयआर दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार

एसआयआर दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार

पुणे | ३ ऑक्टोबर २०२६ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार दावे-हरकतींचा कालावधी १२ ऑक्टोबरपर्यंत असून अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. 

‘नो मॅपिंग’ किंवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील, ईआरओ किंवा एईआरओ कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी करण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. उपलब्ध सुविधेनुसार व्हॉट्सअॅप किंवा ऑनलाइन माध्यमातूनही कागदपत्रे सादर करता येणार आहेत. 

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नयेत यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रारूप मतदार यादीतील नावाची पडताळणी, नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६, तर मतदारांच्या तपशिलातील दुरुस्तीसाठी नमुना ८ स्वीकारण्यात येणार आहे.

याशिवाय ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन मतदार नोंदणी केली जाणार आहे. औद्योगिक आस्थापना, कंपन्या, कारखाने आणि विविध संस्थांमध्येही १२ ऑक्टोबरपर्यंत मतदार जागृती व विशेष नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मतदारांना प्रारूप यादीतील नाव शोधणे, नवीन नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया ऑनलाइनही करता येणार आहे. त्यासाठी ‘वोटर हेल्पलाइन’ अॅपचा वापर करता येईल. अधिक माहितीसाठी १९५० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

नोटीस मिळालेल्या मतदारांनी घाबरून तहसील कार्यालयात गर्दी करू नये, संबंधित बीएलओशी संपर्क साधावा आणि विशेष शिबिरे तसेच ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories