नवी दिल्लीमध्ये पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण
पुणे, ता. २४ - देशातील महत्त्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील 'गणतंत्र मंडप' येथे मंगळवारी (ता. २३) करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.
🔹महाराष्ट्रातील मान्यवरांपैकी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
🔹क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
🔹वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला.
🔹वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे ८९ वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
🔹अभिनेते, पटकथा लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक आर. माधवन यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
🔹ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांचे बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.
🔹उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.