ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान
ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान
पिंपरी, ता. १८ - पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान गुरुवारी (ता. १८) करण्यात आला.
या प्रसंगी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, डाॅ. पांडुरंग भोसले, शाहीर आसराम कसबे, महेंद्र भारती, प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील प्रा. राजेंद्र कांकरिया यांच्या पत्नी छाया कांकरिया (मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान), कुष्ठरुग्ण सेवक दत्तात्रय अत्रे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), कवयित्री जयश्री श्रीखंडे (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान), कवी शिवाजी शिंदे आणि कवयित्री प्राजक्ता पटवर्धन (पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डॉ. सबनीस यांनी आपल्या मनोगतात नारायण सुर्वे यांच्या आपल्या कवितांचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे यांनी, ''बालपणात अनेक महापुरुषांची चरित्रे वाचत असतानाच सुखासीन आयुष्यापेक्षा समर्पित भावनेतून समाजासाठी कार्य करावे, ही खूणगाठ नकळत मनाशी बांधली गेली. नारायण सुर्वे यांना जवळून अनुभवता आले. अण्णाभाऊ साठे आणि नारायण सुर्वे यांनी मराठीला सरस्वतीचे वाण प्रदान केले आहेत. '', अशी भावना व्यक्त केली.
प्राची पटेकर या विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षपूजन, सुभाष चव्हाण यांचे शंखवादन आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी गायलेल्या नारायण सुर्वे लिखित 'डोंगरी शेत माझं गं...' या कवितेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव सातपुते यांनी 'एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे' या शीर्षकांतर्गत सुर्वे यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला. त्यानंतर नारायण सुर्वे काव्यजागर कविसंमेलनात पुरस्कारार्थी कवींसह संगीता झिंजुरके, प्रभाकर वाघोले तसेच भूमिका खंडागळे, रूपाली तायड, अंकिता धिवार, केतन सांगडे, सोनल धिवार या विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण करून दाद मिळवली. मानसी चिटणीस यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला.
इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, सीताराम नरके, प्रा. प्रभाकर दाभाडे, राजू जाधव, स्वाती भोसले, प्रदीप गांधलीकर आणि खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील शिक्षकांनी संयोजन केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.