सांगवी | १ ऑक्टोबर २०२६ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला काम सोडण्यास सांगत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पवनानगर, रहाटणी येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी ४० वर्षीय पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पवनानगर, रहाटणी, पुणे येथे घडली.
या प्रकरणी फिर्यादीचा पती रवी दत्तू जाधव (वय ४०, रा. कल्याण, मुंबई) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी रवी जाधव याने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत “तू काम सोडून दे” असे म्हटले. त्यानंतर त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच किचनमधील चाकू घेऊन फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर, उजव्या हाताच्या तळव्याच्या मागील बाजूस आणि मनगटाच्या वरील भागावर वार करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली. सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.