शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी स्वतःहून पाहणी करून सक्रियपणे कार्यवाही करण्याचे निर्देश
पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते व सार्वजनिक सुविधांची सुरक्षितता आणि देखभाल यांना प्राधान्य देत महापालिका प्रशासनाने दुरुस्तीच्या कामांना गती दिली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते व कनिष्ठ अभियंते यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून आवश्यक बाबींची स्वतःहून नोंद घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. खड्डे बुजविताना कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि सुरक्षितता याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
रस्त्यांसोबतच सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीला प्राधान्य
रस्त्यांबरोबरच रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स, पदपथ तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर सार्वजनिक सुविधांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामांचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करण्यात यावा आणि आवश्यक कामांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय जबाबदारी निश्चित, दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई
प्रत्येक विभागीय कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना सोपविण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालय व वॉर्डमधील कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्तेची तपासणी यावर लक्ष द्यावे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे. सोपविण्यात आलेल्या क्षेत्रातील कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण न झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय कामांचा दररोज घेतला जाणार आढावा
दुरुस्तीच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता यांनी संबंधित कामांचा नियमित आढावा घ्यावा. खड्डे दुरुस्ती तसेच रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या कामांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय दररोज प्रगती तपासून त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुरुस्तीची कामे वेळेत, दर्जेदार आणि समन्वयाने पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी परस्पर सहकार्याने कार्यवाही करावी. नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि दर्जेदार रस्ते व सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सातत्याने देखरेख आणि आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य....
''नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि दर्जेदार रस्ते तसेच सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे प्रमुख प्राधान्य आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे तसेच रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारची प्रतीक्षा न करता आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीची नियमित पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. प्रत्येक क्षेत्राची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. या सर्व कामांचा दररोज आढावा घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.'' – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त,