पिंपरी-चिंचवडमधील उंच स्पीड ब्रेकरला जरा ‘ब्रेक’ लावा! शहरवासीयांची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील उंच स्पीड ब्रेकरला जरा ‘ब्रेक’ लावा! शहरवासीयांची मागणी

पिंपरी-चिंचवड | ६ ऑक्टोबर २०२६ : वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांवर उभारण्यात आलेले काही स्पीड ब्रेकर अवाजवी उंचीचे असल्याने वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अशा स्पीड ब्रेकरमुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच वाहनांचेही नुकसान होत असल्याचे सांगत शहरातील सर्व स्पीड ब्रेकरचे सर्वेक्षण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल पारेख यांनी केली आहे.

पारेख यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकरची उंची आणि आकार अवाजवी आहे. वाहनचालकांना त्यावरून जाताना अचानक ब्रेक लावावे लागत असून विशेषतः दुचाकीस्वारांना याचा अधिक त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी स्पीड ब्रेकर स्पष्ट दिसत नसल्यास अपघाताचा धोका आणखी वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उंच स्पीड ब्रेकरवरून वारंवार वाहने गेल्यामुळे टायर, सस्पेन्शन, शॉक ॲब्झॉर्बर आणि वाहनांच्या इतर भागांचे नुकसान होत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी असल्याचे पारेख यांनी नमूद केले.

वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर आवश्यक असले तरी ते योग्य तांत्रिक निकष, उंची, रुंदी आणि आकारानुसार असणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व स्पीड ब्रेकरची पाहणी करावी. ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची उंची किंवा आकार अवाजवी आहे, ते तातडीने कमी करावेत. तसेच आवश्यक ठिकाणी वाहनचालकांना स्पीड ब्रेकरची पूर्वकल्पना देणारे फलक आणि रस्त्यावर स्पष्ट मार्किंग करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“आयुक्त साहेब, स्पीड ब्रेकरला जरा ब्रेक लावा!” असे म्हणत पारेख यांनी नागरिकांना त्रास होणार नाही आणि वाहनांचे नुकसानही टळेल अशा पद्धतीने स्पीड ब्रेकरची रचना करण्याची मागणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन महापालिका प्रशासन याबाबत तातडीने निर्णय घेणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories