सोसायटीच्या आवारात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

सोसायटीच्या आवारात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड | ६ ऑक्टोबर २०२६ : शहरातील विविध सोसायट्यांच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे पाटील यांनी केली आहे.

याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात, रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याचे प्रकार घडत असल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणी कुत्र्यांकडून चावा घेण्याच्याही घटना घडत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

सोसायट्यांच्या आवारात लहान मुले खेळत असताना तसेच नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडत असताना भटक्या कुत्र्यांचा धोका जाणवत असल्याचे वरखडे पाटील यांनी म्हटले आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम राहत असल्याने प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

सोसायटी परिसरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून निर्बिजीकरण आणि लसीकरणाची विशेष मोहीम राबवावी. आक्रमक आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कुत्र्यांबाबत लागू नियमांनुसार योग्य कार्यवाही करावी. सोसायट्यांमध्ये कचरा आणि अन्नकचरा उघड्यावर पडणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन आणि तक्रार नोंदणी व्यवस्था अधिक प्रभावी करून तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित पथकाने ठराविक कालमर्यादेत घटनास्थळी पोहोचावे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

समस्या तातडीने न सोडवल्यास नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन, निवेदन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही वरखडे पाटील यांनी दिला. निवेदन देताना संतोष मायने उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories