महापालिकेच्या मोरवाडी 'आयटीआय'मधील टर्नर व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थींना मिळाली शिकाऊ उमेदवारी
महापालिकेच्या मोरवाडी 'आयटीआय'मधील टर्नर व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थींना मिळाली शिकाऊ उमेदवारी
पिंपरी, ता. ३० जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील टर्नर व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थींना अंतिम परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच पिंपरीतील पीएमटी मशीन्स लिमिटेड शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) मिळाली आहे.
शिकाऊ उमेदवारी नेमणूकीसाठी पिंपरीतील पीएमटी मशीन्स लिमिटेड येथे मुलाखती घेण्यात आल्या. पीएमटी मशीन्सच्या वतीने चैत्राली पाटील (वरिष्ठ एचआर मॅनेजर) व अजय शर्मा (एचआर मॅनेजर) ह्यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या मुलाखती घेऊन कंपनीबाबत सर्व माहिती दिली. शिकाऊ उमेदवारांना एका वर्षाच्या कालावधीत रुपये २०,४००/- इतके विद्यावेतन, कॅन्टीन सुविधा दिली जाणार आहे. शिकाऊ उमेदवारांना पुढील उच्च शिक्षणासंदर्भात पदविका करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पुढील कालावधीत वर्क परफॉर्मनुसार कायमस्वरूपी रोजगारही मिळू शकतो असेही प्रशिक्षणार्थींना कळविण्यात आले. या दरम्यान टर्नर ट्रेडचे ६ प्रशिक्षणार्थी व इलेक्ट्रिशियन ट्रेडचे ३ प्रशिक्षणार्थी निवडले गेले आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी त्याचप्रमाणे आणखीन विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल असेही कळविण्यात आले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील ह्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येत असल्याबाबतही नमूद केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गटनिदेशक रवी ओव्हाळ व शर्मिला काराबळे तसेच निदेशक लांडगे एन.के., विशाल रेंगडे, सीमा जाधव व कार्यालयीन कर्मचारी अभिनव हातगांवकर यांनी सहकार्य केले.