news
clock

उद्योजक व कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा द्या, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी 

पिंपरी, ता. ११ - ''इराण, इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. शासनाने तर सध्या औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा पूर्णता थांबविला आहे. फॅब्रिकेशन, पावडर कोटींग, सीडी कोटींगसाठी एलपीजी गॅस वापरला जातो. हा गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील जवळपास ७ ते ८ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांचे दररोज कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा उपलब्ध करुन द्यावा.'' अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने केली आहे. 

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने बुधवारी (ता. ११) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सध्या उद्योगांवर ओढावलेल्या संकटाविषयी माहिती दिली. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, संचालक संजय सातव आदी उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, ''आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पूरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे, अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय लघु उद्योजकांपुढे दुसरा पर्याय दिसत नाही.'' 

यावेळी उपाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले की, ''उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा उपलब्ध करुन द्यावा, अशी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी आहे. सचिव जयंत कड यांनी सांगितले , या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना आवाहन करते की, सर्व प्रकारचे इंधन व गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे. त्यामुळे गॅस व इतर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे आखाती देशातून येणारे इंधन होय. या इंधनात भारतात येणारा गॅस, सध्या भारतात येणारा गॅस अनिश्चित स्वरूपात येत आहे. त्यामुळे गॅस दर वाढणे चालू झालेले आहे. तसेच औद्योगिक कारणांसाठी लागणारा गॅस पुरवठा अनेक ठिकाणी कमी प्रमाणात तर काही ठिकाणी बंद झालेला आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

संचालक संजय सातव म्हणाले, ''शासनाने तर सध्या औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा पूर्णता थांबविला आहे. कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे इंधन गॅस स्वरूपात वापरले जातात. फॅब्रिकेशन, पावडर कोटींग, सीडी कोटींगसाठी एलपीजी गॅस वापरला जातो. हा गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील जवळपास ७ ते ८ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांचे दररोज कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. या कारणांमुळे औद्योगिक उत्पादनावर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. उद्योजक हे आपले उत्पादन वेळेवर तयार करू शकत नाहीत. उत्पादन खर्चात वाढ होत आहे, आपली ऑर्डर वेळेत देऊ शकत नाहीत. त्याचा परिणामाने लघुउद्योजकांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण व रांजणगाव औद्योगिक परिसरातील बरेचसे लघु उद्योजक हे बजाज, महिंद्रा, थरमॅक्स व इतर मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्यांवर अवलंबून आहेत. हे लघु उद्योजक जाचक जीएसटी, नोटाबंदी, महागाई, कोरोना काळातील लॉक डाऊन, बँकेचे कर्ज, थकलेले हप्ते यातून अजून सावरलेले नाहीत.''

''आता आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पूरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे, अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय लघु उद्योजकांपुढे दुसरा पर्याय दिसत नाही.

या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना आवाहन करते की, सर्व प्रकारचे इंधन व गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे.'',  असे उपाध्यक्ष संजय जगताप यांनी केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories