पिंपरी-चिंचवड | २९ सप्टेंबर २०२६ : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३६ अन्वये पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
आदेशानुसार, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित क्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार लेखी किंवा तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
या अधिकारांतर्गत जमाव किंवा मिरवणुकीतील व्यक्तींच्या वर्तनाबाबत सूचना देणे, मिरवणूक अथवा जमावाचा मार्ग निश्चित करणे, काही मार्गांवरून जाण्यास प्रतिबंध करणे यांचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची तीव्रता नियंत्रित करणे आणि प्रचारासाठी होणाऱ्या जाहीर सभांचे ठिकाण, तारीख व वेळ यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकारही पोलिसांना असतील.
दिलेल्या आदेशानुसार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे.
हा विशेष आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या भागात २५ सप्टेंबरपासून ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.