ऑनलाईन सेवाकर भरण्यास झोपडपट्टीवासीयांचा मोठा प्रतिसाद

ऑनलाईन सेवाकर भरण्यास झोपडपट्टीवासीयांचा मोठा प्रतिसाद

पिंपरी | २ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीत झोपडपट्टी सेवाकरापोटी २६ लाख १५ हजार २७१ रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. ऑनलाइन सेवाकर भरण्याच्या सुविधेलाही झोपडपट्टीवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ ऑनलाइन माध्यमातून ४२२ पावत्यांद्वारे १२ लाख ४९ हजार ७६२ रुपये जमा झाले आहेत.

१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून एकूण ८३१ पावत्यांद्वारे २६ लाख १५ हजार २७१ रुपये सेवाकर जमा झाला. महापालिकेने सेवाकर भरण्यासाठी दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

मागील वर्षांच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहामाहीतील वसुली अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २५ लाख ३७ हजार २४८ रुपये, २०२३-२४ मध्ये २५ लाख २७ हजार ३८८ रुपये, तर २०२४-२५ मध्ये १० लाख १४ हजार ९६७ रुपयांची वसुली झाली होती. यंदाच्या पहिल्या सहामाहीतच वसुलीचा आकडा २६ लाख १५ हजार २७१ रुपयांवर पोहोचला आहे.

झोपडपट्टी सेवाकराची बिले महिला बचत गटातील महिलांमार्फत वाटप केली जात आहेत. त्यामुळे सेवाकराबाबत जनजागृती होण्याबरोबरच झोपडपट्टीतील महिलांना रोजगाराची संधीही उपलब्ध होत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

ऑनलाइन सुविधांचा विस्तार, करदात्यांमध्ये जनजागृती आणि थकबाकी वसुलीचा सातत्याने आढावा घेतल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी नागरिकांना घरबसल्या सेवाकर भरता येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपायुक्त अण्णा बोदडे यांनी आगामी काळातही सेवाकर संकलन वाढविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories