पीसीयू मध्ये इंडस्ट्री ५.० सेंटरचे उद्घाटन; १६ अत्याधुनिक प्रयोगशाळा

पीसीयू मध्ये इंडस्ट्री ५.० सेंटरचे उद्घाटन; १६ अत्याधुनिक प्रयोगशाळा

पिंपरी | १ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (PCU) साते, वडगाव मावळ येथील कॅम्पसमध्ये ‘इंडस्ट्री ५.० आणि फ्युचर टेक्नॉलॉजीज सेंटर ऑफ एक्सलन्स’ या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. PCUचे कुलपती व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले.

विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष प्रयोग आणि अनुभव घेण्याची संधी या केंद्रातून मिळणार आहे. या उच्च तंत्रज्ञान सुविधांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध करावे. विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि उद्योजकतेच्या गुणांना संधी देणारे हे व्यासपीठ ठरेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

पद्मश्री प्रतापराव पवार यांनी AI, रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल ही क्षेत्रे भविष्यातील उद्योगविश्वात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था आणि विद्यापीठ यांच्या सहकार्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक होऊन रोजगारवाढीस चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

प्रा. रामकृष्ण वडाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-डॅक पुणे, डिजिटेक रोबोटिक इंडिया प्रा. लि. आणि AMD यांच्या सहकार्याने १६ उच्च क्षमतेच्या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन, मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरी ऑटोमेशन, डिजिटल ट्विन, AI व मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, IoT, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट आदींचा समावेश आहे.

हे केंद्र PCU-टाटा मोटर्सच्या मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा कार्यक्रमासह केनिया आणि झांझिबार येथील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित कौशल्य विकास कार्यक्रमासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. उमेश पोतदार यांनी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories