भाडेवाढ केल्याने दोघांना दगडाने मारहाण!

भाडेवाढ केल्याने दोघांना दगडाने मारहाण!

तळेगाव दाभाडे | २ ऑक्टोबर २०२६ : भाडे वाढविल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २८ वर्षीय सिक्युरिटी सुपरवायझर व सिक्युरिटी गार्डला  मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना सोमाटणे येथील रोमन हिल्स सोसायटीच्या गेटवर घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एका ३० वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोद कुमार रामबहादूर वर्मा (वय २८, रा. प्लॉट नं. ई-७०१, रोहन आनंद सोसायटी, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे; मूळ उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. ते सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करतात.

ही घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रोमन हिल्स सोसायटीच्या गेटवर घडली.

फिर्यादीनुसार, आरोपी मोहित देशमुख (वय ३०, रा. रोहन आनंद सोसायटी, सोमाटणे, ता. मावळ, जि. पुणे) याने घरमालकाने फिर्यादीचे भाडे वाढविल्याच्या कारणावरून त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आरोपी फिर्यादीसोबत वाद घालत रोमन हिल्स सोसायटीच्या गेटवर आला. तेथे सिक्युरिटी पुष्पेंद्र अहिरवार याच्यासोबतही वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी आरोपीने फिर्यादीला तसेच पुष्पेंद्र अहिरवार याला मारहाण करून जखमी केले, तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात BNS कलम ११८(१), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साळवे करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories