news
clock
स्थायी समिती सभेत आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी

स्थायी समिती सभेत आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी

स्थायी समिती सभेत आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी

पिंपरी, ता.६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या येसभेत शहरातील आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, रस्ते व नागरी सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. 

यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


शहरातील पाणीपुरवठा व जलनिस्सारण व्यवस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय घेत चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आवश्यक ठिकाणी व्हॉल्व बसविणे तसेच नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. ३१ (नवी सांगवी, रामनगर), प्रभाग क्र. २६ (पिंपळे निलख परिसर) आणि प्रभाग क्र. २९ (पिंपळे गुरव परिसर) येथे जलनिस्सारण नलिका टाकणे व सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच अ, ब, क व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिस्सारण नलिकांची आधुनिक यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. ग व ड क्षेत्रीय कार्यालयांतील आदर्शनगर, मिलिंदनगर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, कैलासनगर, गांधी नगर, इंदिरानगर, बलदेवनगर, संजय गांधी नगर, तापकीर नगर, अण्णाभाऊ साठे नगर, काळाखडक, म्हतोबानगर आदी झोपडपट्टी भागांमध्ये जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी अत्याधुनिक अल्ट्रा हाय डेफिनेशन कॅमेरा सिस्टम (अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपीसाठी) खरेदीस मंजुरी देण्यात आली. आकुर्डी येथील नवीन रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणेची वार्षिक देखभाल व दुरुस्ती, तसेच नवीन तालेरा रुग्णालयातील दरवाजे व खिडक्यांसाठी पडदे बसविणे आणि उदवाहक (लिफ्ट) यंत्रणेची तीन वर्षांसाठी देखभाल करण्यास मान्यता देण्यात आली.

शहरातील स्वच्छता व सार्वजनिक सुविधांसाठी प्रभाग क्र. २३, २४ व २७ मधील सार्वजनिक शौचालयांची यांत्रिक पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्यासाठी चारचाकी वाहन, प्रत्येक वाहनावर चालक व एक कामगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयासाठी एक पर्यवेक्षक व तीन कर्मचाऱ्यांना कंपनी स्थापन होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांची भविष्य निर्वाह निधी रक्कम थेट वैयक्तिक खात्यात जमा करण्यासाठी सल्लागार नेमण्यास मंजुरी देण्यात आली.


पायाभूत सुविधांच्या दृष्टीने स्पाईन रस्त्यावरील खोदकाम केलेल्या चरांची तसेच पावसामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती, प्रजिमा-३१ रस्त्यावरील भूमकर चौकाचे सुशोभीकरण आणि टेल्को रस्त्यावर यशवंतनगर चौक ते दुर्गानगर चौकादरम्यान रोड मार्किंग व दुभाजक रंगसफेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. फुगेवाडी येथे हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम दफनभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे लाईन व ३० मी. एचसीएमटीआर खाली भुयारी मार्ग उभारणे, तसेच त्याच्या मंजुरीसह दहा वर्षांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामाजिक व सांस्कृतिक सुविधांना चालना देण्यासाठी शाहूनगर, संभाजीनगर, आकुर्डी, संत तुकारामनगर आणि केशवनगर-चिंचवड येथील मानधनावरील सार्वजनिक ग्रंथालयांना मुदतवाढ देण्यात आली. तसेच विविध प्रभागांतील उद्याने, शाळा, दुभाजक, आयलंड व मोकळ्या जागांमध्ये तैवान लॉन, ग्रीन लॉन, अमेरिका ब्लू लॉन, पास्को लॉन यांचा पुरवठा व विकास करण्यास मंजुरी देण्यात आली.

याशिवाय महानगरपालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक वाहने भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग क्र. १६ (मामुर्डी-किवळे) येथे पुश-थ्रू पद्धतीने ९०० मिमी व्यासाची ९० मीटर लांबीची एम.एस. ड्रेनेज केसिंग पाइप टाकणे तसेच परिसरातील मनपा इमारती, स्मशानभूमी व इतर ठिकाणी देखभाल व दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.

स्थायी समितीच्या या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून नागरिकांना अधिक दर्जेदार व सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

 *येत्या काळात सर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी...* 

"पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आजच्या स्थायी समिती सभेत आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा, प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था आणि शहरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. येत्या काळात या सर्व कामांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे." - - - अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories