महापालिकेच्या पुढाकारातून लोंढे चाळ परिसरातील पाणीपुरवठा झाला सुरळीत
अवघ्या दोन दिवसांत जलवाहिनीचे काम केले पूर्ण, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
पिंपरी, ता. १८ - कासारवाडी प्रभाग क्रमांक २० मधील रेल्वे गेटजवळील लोंढे चाळ परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता. रेल्वे हद्दीलगतच्या जागेतून नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक परवानगी मिळत नसल्याने हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पर्यायी मार्गाचा अवलंब करत अवघ्या दोन दिवसांत नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण केले असून परिसरात आता स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
लोंढे चाळ परिसरातून खराब पाण्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक होते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने कामाला गती मिळू शकत नव्हती. यावर उपाय म्हणून पाणीपुरवठा विभागाने करसंकलन कार्यालयालगतच्या बाजूने नवीन जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले. त्यानुसार कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली. नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करत अवघ्या दोन दिवसांत नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. यानंतर परिसरातील नळधारकांना स्वच्छ, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा मिळू लागला आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यासाठी कार्यकारी अभियंता विजयसिंह भोसले, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, उपअभियंता साकेत पावरा, कनिष्ठ अभियंता सागर पाटील तसेच 'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दीर्घकाळ रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लागल्याने लोंढे चाळ परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.