महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त PMRDA मुख्यालयात अभिवादन
पिंपरी | २ ऑक्टोबर २०२६ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) आकुर्डी येथील मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले. तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा, शौर्य आणि ‘जय जवान, जय किसान’ या मंत्रामागील राष्ट्रसेवेच्या विचारांना उजाळा दिला.
महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचे विचार आजच्या तरुण पिढीसह प्रशासकीय कामकाजात कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे खराडे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षिका आशा जाधव, तहसीलदार अभिजीत जगताप, अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंते शंकर कोळेकर व डी. एम. चौरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे, सहायक जनसंपर्क अधिकारी तुषार बिडवे, कनिष्ठ अभियंता विश्वनाथ क्षीरसागर यांच्यासह PMRDAचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही महापुरुषांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.