पिंपळे गुरव स्मशानभूमीतील रॅम्प धोकादायक; दुरुस्तीची मागणी

पिंपळे गुरव स्मशानभूमीतील रॅम्प धोकादायक; दुरुस्तीची मागणी

पिंपळे गुरव | २६ सप्टेंबर २०२६ : पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले असले, तरी प्रवेशद्वाराजवळ तयार करण्यात आलेल्या रॅम्पची रचना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे यांनी केली आहे. या रॅम्पची तातडीने पाहणी करून सुरक्षित, कमी उताराचा आणि नॉन-स्लिप रॅम्प तयार करण्याची मागणी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, स्मशानभूमीत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना असलेल्या रॅम्पवर मोठ्या आकाराचे कडप्पे बसविण्यात आले आहेत. ते ज्या पद्धतीने बसविण्यात आले आहेत, त्यामुळे अंत्यविधीसाठी तिरडी घेऊन खाली उतरताना नागरिकांची चप्पल किंवा पाय अडकण्याची शक्यता आहे. तसेच उतारावरून जाताना घसरण्याचा धोका असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अडचण होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

तिरडी घेऊन उतरताना एखाद्या व्यक्तीचा पाय घसरला किंवा कडप्प्यात अडकून तोल गेला, तर तिरडीसह मृतदेह खाली पडण्यासारखी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता असल्याची भीतीही सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने रॅम्पची तातडीने पाहणी करावी, धोकादायक ठरणारी सध्याची रचना आवश्यकतेनुसार काढावी आणि तिरडी सहज व सुरक्षितपणे नेता येईल असा मजबूत, योग्य उताराचा आणि घसरणार नाही असा रॅम्प तयार करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

स्मशानभूमीसारख्या संवेदनशील आणि सार्वजनिक वापराच्या ठिकाणी सौंदर्यापेक्षा नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा यांना प्राधान्य देऊन तांत्रिकदृष्ट्या योग्य सुधारणा कराव्यात, अशी मागणी सोनवणे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories