रावेत | २५ सप्टेंबर २०२६ : भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविलेल्या बुलेट मोटारसायकलने पुढे जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना रावेत परिसरात घडली. या अपघातात रिक्षाचालकाच्या छाती, डोके, चेहरा आणि कमरेला गंभीर दुखापत होऊन तो मृत्युमुखी पडला तसेच रिक्षाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी २० वर्षीय बुलेट चालकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास न्यू बीआरटी रोड, अपूघरजवळील बसस्टॉपशेजारी, रावेत येथे घडली.
याप्रकरणी चिन्मय महेश बरीदे (वय २०, रा.बाणेर, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी चिन्मय हा त्याच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकल क्रमांक MH 14 MP 3555 भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि हयगयीने चालवत होता. त्याने फिर्यादीचे पती अनिल श्रीपतराव तांबे हे चालवत असलेल्या रिक्षा क्रमांक MH 14 JP 1586 ला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे फिर्यादीचे पती खाली पडले. त्यांच्या छाती, डोके, चेहरा आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या रिक्षाचेही नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि कुंभार पुढील तपास करत आहेत.