पुणे | ६ ऑक्टोबर २०२६ : चाकण औद्योगिक वसाहतीतील घनकचरा प्रकल्पानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) पूर्व हवेलीतील कचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. थेऊर आणि परिसरातील एकूण १४ ग्रामपंचायतींसाठी थेऊर येथे १० एकर जागेवर १५० टीपीडी (टन प्रतिदिन) क्षमतेचा मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाबाबत ६ ऑक्टोबर रोजी पीएमआरडीएच्या आकुर्डी मुख्यालयात शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या उपस्थितीत आणि महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासह पीएमआरडीए, जिल्हा परिषद, हवेली पंचायत समितीचे अधिकारी आणि संबंधित गावांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
थेऊर येथील उपलब्ध गायरान क्षेत्रापैकी १० एकर जागा प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सन २०४३ मधील संभाव्य लोकसंख्या लक्षात घेऊन प्रकल्पाची क्षमता १५० टीपीडी निश्चित करण्याचे नियोजन आहे.
प्रकल्पस्थळापासून २० किलोमीटरच्या आतील सहभागी ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील कचरा संकलित करून प्रकल्पस्थळी आणावा लागणार आहे. कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी निश्चित करण्यात येणारी ‘टिपिंग फी’ संबंधित ग्रामपंचायतींना भरावी लागणार आहे. प्रकल्पात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतींकडून ठरावही मागविण्यात आले आहेत.
या प्रकल्पात थेऊर, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोळवडी या १४ गावांचा समावेश आहे.
आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रामपंचायतींना कचरा वाहतुकीसाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घंटागाड्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. लगतच्या इतर ग्रामपंचायतींनीही प्रकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
चाकण एमआयडीसी परिसरातील १९ ग्रामपंचायती आणि दोन नगरपरिषदांसाठी मध्यवर्ती घनकचरा प्रकल्पाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता पूर्व हवेलीसाठीही पीएमआरडीएने या प्रकल्पाचे नियोजन केले आहे.