पुणे | ६ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्षप्रचाराचे फलक आणि झेंडे लावण्याबाबत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये याबाबत आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, राजकीय पक्षांचे उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार तसेच त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवरील पक्षाचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूला विंडो स्क्रीन ग्लासच्या पुढे असता कामा नये. तसेच झेंडा वाहनाच्या टपापासून दोन फुटांपेक्षा अधिक उंचीचा असता कामा नये.
प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक लावायचा असल्यास तो वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला लावण्यात यावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पक्षप्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक कोणत्याही वाहनावर सरसकट लावता येणार नाही. संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार किंवा उमेदवाराच्या निवडणूक प्रतिनिधीने प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनावरच झेंडा अथवा कापडी फलक लावता येणार आहे.
हे निर्बंध संपूर्ण पुणे जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदीनुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.