पुण्यातील एचसीएमटीआर अंतर्गत बोगद्यांचे जाळे व रिंगरोड प्रकल्पांना गती द्यावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पुण्यातील एचसीएमटीआर अंतर्गत बोगद्यांचे जाळे व रिंगरोड प्रकल्पांना गती द्यावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ - पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख शहरी वाहतूक प्रकल्पांच्या नियोजन, वित्तीय व्यवस्थापन, अंमलबजावणी व देखरेखीसाठी गठित उच्चस्तरीय समितीची बैठक सोमवारी (ता. २८) सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर) हा पुण्याच्या भविष्यातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा एक परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. एचसीएमटीआर व बोगदा प्रकल्प हे पुणे शहर अधिक कार्यक्षम, वाहतूक-सुलभ व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या तीनही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांना देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढण्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. तसेच, रिंगरोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला देण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची माहिती दिली.
उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर) वैशिष्ट्ये -
🛣️एकूण अंदाजे ३६ किमी लांबीचा सहा पदरी उन्नत मार्ग.
🛣️पुणे शहरातील मध्यवर्ती नागरी भागातून जाणार.
🛣️प्रकल्पाचा अपेक्षित खर्च – बांधकामासाठी सुमारे ९ हजार कोटी रुपये, तर भूसंपादनासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपये.
🛣️सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी एकात्मीकरण करणार.
🛣️एचसीएमटीआरमधील पॅकेजेस – बोपोडी ते सिंहगड रस्ता (१०.५ किमी), सिंहगड रस्ता ते सोलापूर रस्ता (१३.२ किमी), सोलापूर रस्ता ते एअरपोर्ट चौक (१०.२१ किमी), एअरपोर्ट चौक ते बोपोडी (९.१७ किमी).
🌉पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंगरोडची वैशिष्ट्ये :
▶️प्रकल्पाचा एकूण खर्च २५,१५९.८८ कोटी रुपये.
▶️टप्पा १– सोळू इंटरचेंज ते वडगाव शिंदे (महापालिका हद्द) (४.७० किमी), तसेच लोहगाव (महापालिका हद्दीपासून) ते वाघोली (७.५६ किमी).
▶️टप्पा २– वाघोली ते कदमवाक वस्ती (९.३६ किमी).
▶️टप्पा ३ – कदमवाक वस्ती ते जांभूळवाडी (२१.४८ किमी).
▶️टप्पा ४– जांभूळवाडी ते भूगाव (१४.२१ किमी).
▶️टप्पा ५– भूगाव ते परंदवाडी (२५.८० किमी).