पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी एका सदस्याची निवडणूक होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर पुणे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केली आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवार किंवा त्यांचा कोणताही प्रस्तावक नामनिर्देशन पत्र दाखल करू शकणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे यांच्याकडे दाखल करता येतील.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026 आहे. सार्वजनिक सुट्टी वगळून कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रशासकीय सुट्टी असूनही शनिवार, 3 ऑक्टोबर रोजीही याच वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत.
नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार, 7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयात होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. उमेदवार, त्यांचा लेखी प्राधिकार असलेला प्रस्तावक किंवा निवडणूक प्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्याकडे उमेदवारी माघारीचा अर्ज सादर करू शकतो.
पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी ही माहिती दिली आहे.